Sandip Kale
Sandip Kale
Reporter Writer Publisher
Sandip Kale

Blog

माझ्या एका पुस्तकातले मनोगत

माझ्या एका पुस्तकातले मनोगत

मनोगत

29 वर्षांचा आयुष्याचा प्रवास म्हणजे खूप मोठा काळ नाही. आत्ता आत्ता कुठे घडी बसते आहे. सारं काही सुरळीत आहे असं नाही; पण रुळांवर मात्र आहे. मी निवडलेलं पत्रकारितेचं क्षेत्र हीच माझी अंतिम निवड आहे, असं आता ठामपणे वाटू लागलं आहे. या क्षेत्रात रमतो आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं, असा भाबडा ध्यास सतरा-अठराव्या वर्षीच घेतला होता. तेव्हा डोळ्यांपुढं आयुष्याचं चित्र फारच अस्पष्ट होतं. पाटणूरच्या मातीचा गंध मागं पडला तेव्हा मी दहावीत होतो. नेमकी मनोभूमिका आणि आयुष्याची दिशा ठरण्याचं ते वय नव्हतं, तरी एका अनामिक ओढीनं मी समाजवादी जीवनशैलीच्या दिशेनं निघालो मात्र होतो. प्रस्थापित, दैववादी, पूजापाठ मानणारी आणि जातिव्यवस्थेला पूरक अशा विचारांच्या विरुद्धचा हा प्रवास होता.

या प्रवासात सुरुवातीला जे लोक भेटले त्यांनी तर माझे रस्ते अधिक उजळून टाकले. प्रा. राजाराम वट्टमवार, प्रा. सुरेश पुरी, विद्याभाऊ सदावर्ते म्हणजे माझं 'लाईट हाऊस'. सर्वप्रथम यांनीच माझी मनोभूमी नांगरली. माझ्यात विवेकनिष्ठ विचारांचं बी पेरलं. माझी माती या पिकांसाठी आसुसली होतीच. का कोण जाणे; पण मी हे सर्व अगदी सहजपणे स्वीकारलं. आता योग्य रस्ता गवसला होता. प्रचंड उत्साह, उन्मेष आणि काहीतरी करण्याची (नेमकं काय ते अनिश्चित!) खुमखुमी या अशा अवस्थेत आडकाठी घातली ती आर्थिक परिस्थितीनं. जेमतेम शिकण्याची सोय होती. अतिरिक्त उपद्व्यापासाठी एक रुपयाही खिशात नसायचा. तशातच छात्रभारतीत दाखल झालो. छात्रभारतीनं पुन्हा मनाची मशागत केली. माझ्या आयुष्याची जडणघडण याच मार्गानं होणार, हे आता जवळजवळ निश्चित झालं होतं. आर्थिक अडचणींची भिंत पुढं पुढं अधिकाधिक मोठी होऊ लागली; मात्र आता एका वेगळ्याच बळानं मन उंचावत होतं.

बी.ए.ची पदवी प्राप्त केली आणि लगेचच राष्ट्रसेवा दलात सामील झालो, पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून. राष्ट्रसेवा दलानं माझ्या भूमिका ठाम केल्या. अनेक समाजपुरुषांची ओळख करून दिली. बाबा आमटे, विकास आणि प्रकाश आमटे, मेधाताई पाटकर, अभय आणि राणी बंग, निळू फुले, डॉ. लागू या विभूतींची भेट झाली. मी आजपर्यंत राष्ट्रसेवा दलाच्या राज्य कार्यकारिणीवर आहे आणि मला याचा अभिमान वाटतो.

10वी पासूनच अनेक वर्तमानपत्रांत माझे लेख, कथा, कविता येत असत. तेव्हा मित्र म्हणत, 'अरे वा! तू तर छानच लिहितोस!'

बी.ए.नंतर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी औरंगाबादला जावं लागलं. नांदेडला असताना  'लोकमत'मधील कामाचा अल्प अनुभव पदरी होता. शिक्षण सुरू असतानाच औरंगाबादमध्ये शिवाजी बनकर पाटील यांच्या 'लोकाश्रय' साप्ताहिकात कार्यकारी संपादक म्हणून रुजू झालो. ते दिवस मला आजही आठवतात. माझा मित्र मंगेश महामुने आणि मी, एक वडापाव खाऊन दिवस ढकलायचो.

पुढं दैनिक 'सांजवार्ता' येथे उपसंपादक म्हणून रुजू झालो. त्याच काळात सारिकाशी (पावडे)माझे लग्न झालं. सारिका आयुष्यात आली आणि आयुष्याचं एक नवं पर्वच जणू सुरू झालं! लग्नानंतर लगेच 'आय.बी.एन. लोकमत'ची ऑफर आली. नांदेडचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करायला सांगण्यात आले. मी ही संधी दवडली नाही. तात्काळ नांदेडला बिऱहाड हलवलं. आर्थिक चणचणींनी अजूनही पिच्छा सोडला नव्हता; मात्र दिवस छान चालले होते. सारिकाच्या सोबतीनं जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला होता. इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करण्याचा अनुभव नवीन होता; पण या नावीन्याचं आकर्षणही तेवढंच होतं. तरीही 'प्रिंट'मध्ये लिखाण करण्याची खुमखुमी शांत बसू देत नव्हती. माझे मार्गदर्शक मित्र प्रा. मनोज बोरगावकर यांनी दैनिक 'उद्याचा मराठवाडा'त काम करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. मीही तो स्वीकारला. छात्रभारती आणि राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारांचा प्रभाव माझ्या लिखाणावर न पडता तरच नवल! मी अतिशय प्रामाणिकपणे आणि सचोटीनं काम करू लागलो. बातमी किंवा फिचरच्या रूपानं मी माझ्यातील सकारात्मक मानसिकतेला वाट करून दिली. समाजातील उपेक्षित, पण फिनिक्सच्या वंशातले, जगण्याची उमेद जागवणारे कितीतरी घटक मग माझ्या बातमीचे विषय झाले. त्याशिवाय अपप्रवृत्तींवर प्रहार करणाऱया बातम्याही मी धुंडाळून प्रसिद्ध केल्या. मात्र, केवळ बातमी 'बनवण्यासाठी'नसते उपद्व्याप करण्याच्या भानडीत कधीच पडलो नाही. आपल्या उत्खननाची परिणती काय असेल याबाबत मी सदैव जागरूक राहिलो आहे. 'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही.....' या दुष्यंतकुमारांच्या दमदार ओळी माझ्या पत्रकारितेचा कणा राहिल्या आहेत आणि हेच माझं अंतिम ध्येयही आहे.

अशातच आम्ही 'उद्याचा मराठवाडा'मध्ये दर रविवारी 'संडे स्पेशल' नावाचे एक सदर सुरू केले. या सदराच्या माध्यमातून मी दर रविवारी पहिल्या पानावर नवनव्या विषयांत रंग भरले. बातमीचा शोध घेताना रक्त आटवावं लागतं. पराकोटीचा पिच्छा पुरवावा लागतो. आपल्या लेखनातून एखाद्या निरपराध जीवावर अन्याय होणार नाही, यासाठी कमालीचं जागरूक असावं लागतं. बातमीची सच्चाई मग समाजमनाची पकड घेते आणि सोबतच आपलीही झडती होतच राहते. पाय घसरण्याच्या खूप संधी येतात. आमिष वाकुल्या दाखवितात. 'बातमी छापायची' आणि 'न छापायची'; दोन्ही बाजूंनी हात ओले करण्याच्या ऑफर मिळायला लागतात. ज्या माणसांना आपण पांढऱया स्वच्छ सदऱयात पाहिलं असतं त्याच माणसांचं सदऱयातल्या आतलं बनियन किती कुबट वास मारणारं आहे याचा प्रत्यय येऊ लागतो.

एव्हाना मी राम शेवडीकरांच्या परिवाराचा एक सदस्य बनून गेलो आहे. राम शेवडीकर, मोहिनीताई शेवडीकर, आनंद शेवडीकर, प्रफुल्ल कुलकर्णी, रविकुमार कुलकर्णी, किरण कुलकर्णी आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे दोन सहकारी प्रदीप आडसकर व सुहास दुधेकर असे हे सगळे आता माझा परिवार बनले आहेत.

'संडे स्पेशल' मधील निवडक लेखांचं पुस्तक करावं, अशी कल्पना काही मित्रांनी मांडली. तोवर 'आपलं एखादं पुस्तक असावं' असं कधीच वाटलं नव्हतं. नयन बाराहाते आणि राम शेवडीकर या सुहृदांनी पुस्तकनिर्मितीची संपूर्ण जबाबदारी घेतली. प्राचार्य डॉ. सुरेश सावंत, राम शेवडीकर, प्रा. राघवेंद्र कट्टी, राजेश मुखेडकर, रमेश चित्ते या मित्रांनी पुस्तक निर्मितीत मोलाचे सहकार्य केले. डॉ. सावंत आणि राजेश मुखेडकर यांनी तर भाषादोष दूर करून पुस्तकाच्या परिपूर्णतेत मोठी भूमिका पार पाडली. मुर्तुजा अथर या भावंडाने निर्दोष अक्षरजुळवणी केली. सगळ्यांनी हे पुस्तक येईपर्यंत त्यावर वेगवेगळ्या पद्धतींनी संस्कार केले.

छात्रभारती, राष्ट्रसेवा दल, सर्वोदय, अंनिस अशा वेगवेगळ्या चळवळींत काम करीत असल्यामुळे त्या चळवळींची छाप माझ्या लिखाणावर नक्कीच आहे. प्रा. राजाराम वट्टमवार सर यांच्यामुळे बाबा आमटे यांची सामाजिक चळवळ जवळून बघता आली. त्या चळवळीत प्रत्यक्ष सहभागी होता आलं. बाबा आमटेंच्या चळवळीसंदर्भातील बऱयाच विषयांवर या पुस्तकात लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. बाबा आमटे यांचा मला खूप दिवसांचा सहवास लाभला. आज बाबा आमटे असते, तर त्यांना हे पुस्तक पाहून नक्कीच खूप आनंद झाला असता. प्रा. राजाराम वट्टमवार, कविवर्य प्रा. फ. मुं. शिंदे, माणसं जोडणारा माणूस म्हणून सर्वांना परिचित असणारे गुरुवर्य प्रा. सुरेश पुरी (बाबा), गुरुवर्य प्रा. डॉ. सुहास पाठक, दुसऱयांसाठी सतत धडपडणारे माझे मामा डॉ. अवधूत निरगुडे व भागवत निरगुडे या सहा प्रेरक व्यक्तिमत्त्वांची माझ्यावर छाप आहे. या सहा मार्गदर्शकांकडून मला जे काही मिळालं, ते आयुष्यभर पुरेल असंच आहे. मी विवेकानंद महाविद्यालयाच्या  पत्रकारिता विभागात विभागप्रमुख म्हणून गेल्या 3 वर्षांपासून कार्यरत आहे. येथे काम करताना संस्थेचे प्रमुख मुकेश पाटील टाकळीकर, प्राचार्या स्मिता नायर आणि प्राध्यापकवृंद या सर्वांच्या सहवासातून बरंच शिकण्यास मिळालं.

 

 

                                                                       

                                                                       संदीप रामराव काळे

Add Comment